गुन्हेगार कितीही मोठा असला, तरी त्याचा बेसावधपणा नडतो. प्रेयसीला भेटायला आलेला दाऊदशी जवळीक असलेला कुख्यात ड्रग माफिया असाच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

अंमली पदार्थविरोधी पथकाकडून अटक

दक्षिण मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा करणारा तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जवळीक असलेला कुख्यात ड्रग माफिया सोनू पठाण याला मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

अटक केलेल्या सोनू पठाणवर गंभीर अशा दहा गुन्ह्यांची नोंद असून तो तडीपार होता. तो आपल्या एका प्रेयसीला भेटायला आला होता. या वेळी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

ड्रग व्यवसायातला गुरू

सोनू पठाण हा दक्षिण मुंबईपासून बांद्रापर्यंत अनेक ड्रग्ज विक्री करणाऱ्या लोकांना ड्रग्ज पुरवित होता.

ड्रग्जचा कारखाना चालविणाऱ्या चिंकू पठाण आणि डोंगरीची ड्रग माफिया क्वीन इकरा कुरेशीच्या ड्रग व्यवसायात सोनू पठाण हा गुरू असल्याचे म्हटले जाते.

तडीपार असला तरी मुंबईत वावरायचा

सोनू पठाण सध्या तडीपार होता, तरीदेखील तो मुंबईत वावरत होता. त्याच्या विरोधात ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकड़े तीन गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

तसेच मुंबई पोलिसांच्या विविध पोलिस ठाण्यात धमकी, हत्येचा प्रयत्न, ड्रग्स विक्री आणि आयपीसीच्या विविध कलमाखाली एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

चिंकू पठाणला पुरवित होता ड्रग

सोनू पठाण हा ड्रग्जचा मोठा सप्लायर असून थेट डॉन दाऊदच्या संपर्कामध्ये असल्याचे म्हटले जाते.

महत्वाची बाब म्हणजे डोंगरी भागात ड्रग्जचा कारखाना चालविणाऱ्या आणि एनसीबीमार्फत काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपी चिंकू पठाणला सोनू ड्रग्जचा पुरवठा करत होता.

Advertisement

डोंगरीची लेडी डॉन आणि महिलांमार्फ़त मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज रॅकेट चालविणारी ड्रग माफिया म्हणून क्वीन इकरा कुरेशी हिची ओळख आहे.

याच ड्रग माफिया क्वीनचा सोनू पठाण हा ड्रग्ज व्यवसायातील गुरू असल्याचे म्हटले जाते. कारण इकरा ही सोनू पठाणकडून ड्रग्ज घेऊन नंतर हाच ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर विकत होती.

Advertisement