पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर पतीनं चाकूनं सपासप वार केल्याची संतापजनक घटना हडपसरमध्ये घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीला तिच्या बहिणीच्या घरून सासूच्या घराकडं नेत असताना भर रस्त्यात पतीनं हे कृत्य केलं.
हे आहे आरोपीचं नाव
आरोपीनं अनैतिक संबंधाच्या रागातून ही हत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली नितीन निकम असं हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे, तर नितीन बापू निकम असं 33 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. दोघंही पती-पत्नी भोसरीतील चक्रहास वसाहतीत वास्तव्याला होते.
पत्नीच्या चारित्र्याचा होता संशय
काही दिवसांपासून पती नितीन हा अंजलीवर नेहमी चारित्र्यावरून संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात अनेकदा वादही झाले आहेत. अलीकडेच अंजलीचं आपल्या पतीसोबत कडाक्याचं भांडण झालं.
यामुळं ती पतीच्या त्रासाला कंटाळून हडपसर गाडीतळ येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे गेली. पत्नी बहिणीकडे गेल्याचा राग मनात धरून नितीननं अंजलीच्या हत्येचा कट रचला.
तो आपल्या पत्नीला घेण्यासाठी मेव्हुणीच्या घरी गेला. पत्नीला घेऊन तो, आपल्या मुलाला घेण्यासाठी सासूच्या घराकडे निघाला. गाडीतळ बंटर शाळेच्या आवारात निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि आपल्या पत्नीवर चाकूनं सपासप वार केले.
हत्येची घटना उघडकीस येताच अंजलीची बहीण वैशाली अर्जुन गायकवाड यांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.