पुणे : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या आघाडीने विजय झाला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान केले आहे.
सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला, बुलढाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले.
असे चंद्रकांत पाटील म्हणाले. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
भाजपाला मुंबई आणि अकोला, बुलढाणा, वाशिम या जागा नव्याने मिळाल्या आहेत. सदस्य म्हणून अपात्र ठरण्याच्या भितीने ते त्या त्या पक्षासोबत राहत असले तरी गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपाला मतदान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही याची या लोकप्रतिनिधींना विशेषतः शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जाणीव आहे.
अशी टीका चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. महाविकास आघाडी सरकारला स्वतःच्याच आमदारांची खात्री नसल्यामुळे नियम बदलून आवाजी मतदान निवडणूक घेण्याचा प्रयत्न चालू आहे.
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आमदारांच्या गुप्त मतदानाने करावी, असा विधानसभेचा मूळ नियम आहे आणि तसा प्रघातही आहे.
महाविकास आघाडी सरकारने मूळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी आणि आमदारांना गुप्त मतदानाची मुभा द्यावी, मग त्यांना कळेल की अध्यक्ष कोण होतो? असे खुले आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.