Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

गृहमंत्र्यांच्या तालुक्यात सराईत गुंडाची दिवसाढवळ्या हत्या

मंचरमध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला आहे. ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले (वय 24 रा. मंचर पांढरीमळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना एकलहरे गावच्या हद्दीत घडली.

हमालाच्या खुनाचा होता आरोपी

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले हा सराईत गुन्हेगार होता. एका हमालाच्या खून प्रकरणात तो आरोपी होता.

आज दुपारी एकच्या दरम्यान घरून भंगार घेऊन तो निघोटवाडी कॉलनी येथील पोल्ट्रीशेड वर गेला होता. भंगार तेथे ठेवून दुचाकीवर दोन मित्रांसोबत फकीरवाडी एकलहरे येथे निघाला होता.

Advertisement

एकलहरे गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी आली असता अज्ञात हल्लेखोराने ओंकार बाणखेले त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याचा खून केला आहे.

त्याच्या डोक्यात दोन गोळ्या मारण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

पूर्ववैमनस्यातून खून

मंचर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

Advertisement

उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी निघाले आहेत.

पूर्ववैमनस्यातून खुनाची ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खुनाच्या या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

ओंकार बाणखेले याच्यामागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार असून दोन महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता.

Advertisement

दरम्यान बाणखेले यांच्यासोबत असलेल्या दोघांकडून घटनेसंदर्भातील माहिती घेतली जात आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत यासंदर्भात फिर्याद दाखल झाली नव्हती.

 

Advertisement
Leave a comment