येत्या दोन वर्षात सर्वांसाठी घर हाच सरकारचा उद्देश आहे. राज्य सरकारच्यावतीने राज्यातील बेघरांना २०२२ च्या अखेरपर्यंत सर्वांसाठी घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यामुळे सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

तीन हजार सदनिकांचे वितरण

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) २ हजार ९०८ सदनिका वितरणासाठीची ऑनलाइन सोडत पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने आदी उपस्थित होते.

Advertisement

निराश न होता घरांसाठी पुन्हा प्रयत्न करा

पवार म्हणाले, ‘मुंबई, पुण्यासारख्या महानगरात आपलंही एक हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. ‘म्हाडा’च्या लॉटरीत घरांसाठी अर्ज करणे हासुद्धा या प्रयत्नाचाच एक भाग आहे.

प्रयत्न करणाऱ्यांपैकी सर्वांनाच घर मिळावं, असे प्रत्येकाला वाटत असते; परंतु आज फक्त २ हजार ९०८ जणांचेच घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

यामध्ये ज्यांना घर मिळणार नाही, अशांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. एक ना एक दिवस प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Advertisement

‘समाविष्ट गावांचा विकास करू ’

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३ गावे नुकतीच पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली आहेत. शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या या भागाचाही सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.

पुणे हे राहण्यासाठी राज्यातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाते; मात्र आता हे शहर देशात सर्वोत्तम बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

Advertisement