लसीकरणाची आकडेवारी देण्यास रुग्णालयांकडून दिरंगाई

file photo

पुणे : कोरोनाचे लसीकरण करण्याची खासगी संस्थांना द्यायला परवानगी असली, तरी त्यांनी लसीकरणाची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक आहे; परंतु महापालिकेकडे या लसीकरणाची आकडेवारी सादर करण्यात रुग्णालयांकडून दिरंगाई होत आहे.

सरकारी आकडेवारीत तफावत

दररोज शेकड्यात तर काही हजार नागरिकांचे लसीकरण करणारी ही रुग्णालये तांत्रिक अडचणी सांगून माहिती उपलब्ध करत नाहीत.

त्यामुळे पुण्यात प्रत्यक्ष होणारे लसीकरण आणि सरकारी आकडेवारी यात तफावत दिसते. काही विशिष्ट रुग्णालयांकडूनच ही दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे.

माहितीसाठी वारंवार करावा लागतो पाठपुरावा

कोरोना प्रतिबंधक लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम (नॅशनल प्रोग्रॅम) आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने शहरात दररोज होणाऱ्या लसीकरणाची माहिती सादर करणे सर्व केंद्रांना बंधनकारक आहे.

याच माहितीच्या आधारे महापालिकेच्या हद्दीत दररोज होणाऱ्या लसीकरणाची आकडेवारी महापालिकेकडून को-विन पोर्टलवर भरली जाते. असे असले, तरी प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या लसीकरणाची माहिती मिळविण्यासाठी पालिकेच्याच यंत्रणेला वारंवार विनंती करावी लागत आहे.

रुग्णालयाचा प्रतिसाद अत्यल्प

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फोन केल्यानंतर तो उचलला न जाणे, संपर्क क्रमांक दिलेला व्यक्ती सुटीवर असणे, माहिती तयार नसणे अशी उत्तरे दिली जातात.

काही वेळा खासगी रुग्णालयांचे कर्मचारी केवळ लसीकरणाचा एकत्रित आकडा देतात; मात्र त्यात वय, आरोग्य कर्मचारी-फ्रंटलाइन कर्मचारी अशी विभागणीच केलेली नसते. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढतात,’ असेही सूत्रांनी नमूद केले.

वर्गीकरण करण्यास टाळाटाळ

‘महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर प्रशिक्षित ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ आहेत. खासगी रुग्णालयातील ‘डेटा एंट्री ऑपरेटर’लाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. असे असूनही सुमारे १५ ते २० खासगी रुग्णालये आपल्याकडील लसीकरणाचा आकडा व त्याचे वर्गीकरण देण्यास टाळाटाळ करत आहेत.

को-विन पोर्टलमध्ये अडचण येणे, इंटरनेट सुविधा बंद असणे किंवा अन्य तांत्रिक समस्या असणे अशी कारणे त्यासाठी दिली जातात. महापालिकेच्या; तसेच बहुसंख्य खासगी रुग्णालयांना अशी अडचण कधीच येत नाही. काही विशिष्ट रुग्णालयांनाच या अडचणी का येतात? याचा शोध घेणे आवश्यक आहे.