file photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी किती काळ विरोधात बसायचे? आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ने भारतीय जनता पक्षाशी युती करावी,

अशी मागणी मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. पुणे महापालिकेत २०१२मध्ये मनसेचे २९ नगरसेवक होते. त्यानंतर २०१७च्या भाजपच्या लाटेत सर्वाधिक फटका मनसेला बसला आणि त्यांचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले.

त्यातही १० हजारांपेक्षा अधिकची मते केवळ शहराध्यक्ष वसंत मोरे यांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या वाटेवर घेऊन जायचे असले, तर पुण्यात मनसेने भाजपशी युती करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

यात मनसेचे संख्याबळही वाढेल आणि भाजपलाही मनसेचा फायदा होईल. परिणामी हे दोन्ही पक्ष सत्तेत येण्याची शक्यता अधिक राहणार असल्याचे गणित पुण्यातील मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडले आहे.