File Photo

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया जुलैअखेर पूर्ण करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले असले, तरी या आयोगाची बहुतांश सदस्यांची पदे रिक्त आहेत.

अवघे दोन सदस्य सात हजार जणांच्या मुलाखती कशा घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सदस्य नियुक्ती कधी होणार?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज गतिमान होण्यासाठी सदस्यांसह कार्यालयीन पदे पूर्णपणे भरलेली असावीत; मात्र जून 2018 पासून रिक्त असलेल्या चार सदस्यांची पदे अजूनही भरण्यात आली नाहीत.

Advertisement

दुसरीकडे 31 जुलैपर्यंत आयोगाची सर्व पदे भरू, अशी ग्वाही पवार यांनी अधिवेशनात दिली; मात्र सहा हजार 978 आणि “एसईबीसी’तून “ईडब्ल्यूएस’ व खुल्या प्रवर्गात नव्याने समाविष्ट होणाऱ्या अंदाजित दोनशे उमेदवारांच्या मुलाखतीसाठी दोन सदस्यांना तेवढ्या वेळेत अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना चार सदस्यांची नावे कधीपर्यंत जातील व राज्यपाल त्यावर तत्काळ स्वाक्षरी करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

31 जुलैपूर्वी निवड प्रक्रिया अवघड

पुण्यातील स्वप्नील लोणकर या भावी अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटले.

Advertisement

त्यानंतर पवार यांनी आयोगातील सर्व जागा 31 जुलैपर्यंत भरण्यात येतील, असे स्पष्ट केले; मात्र आयोगातील सदस्य निवडी असो वा मुलाखती, नियुक्तीच्या प्रतीक्षेतील भावी अधिकाऱ्यांसंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी किमान 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागेल, असे आयोगातील सूत्रांनी सांगितले.

मुलाखतीची वेळ निश्चित करण्यापूर्वी 15 दिवस अगोदर कार्यक्रम जाहीर करावा लागतो. सध्या अभियांत्रिकीची सिव्हिल सेवा, वनसेवा, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, विद्युत अभियांत्रिकीसह अन्य क्षेत्रातील सात हजार उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत; मात्र आयोगात सध्या दोनच सदस्य असल्याने दररोज केवळ 15 जणांच्याच मुलाखती होऊ शकतात.

त्यामुळे 31 जुलैपर्यंत संपूर्ण प्रक्रिया होणे अशक्य असल्याचेही आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement