Pune – येत्या 15 फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. बॅकलॉग’च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतली जाण्याच्या शक्यता आहे. याबाबत मात्र, परीक्षा विभागाच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यासाठी येत्या २९ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होतील असे विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र परीक्षा मंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच व्यवस्थापन परिषदेकडून एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या खर्चास मान्यताही घेण्यात आली नाही.

Advertisement

त्यामुळे परीक्षा विभागाच्या कामकाजावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नाराज आहेत. त्यामुळे परीक्षा विभागाच्या एकूण कामकाजावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे.

मागच्या वर्षी ऑनलाईन परिक्षेची निविदा उशीरा राबवली होती. त्यामुळे परीक्षेला विलंब झाला होता. या वर्षीसुद्धा ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीबरोबर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झालेली नाही.

विद्यापीठाच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. मात्र अद्याप परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Advertisement

मात्र, सुरुवातीला पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू केली जाणार असून त्यानंतर अंतिम वर्षाच्या, द्वितीय वर्षाच्या व नंतर प्रथम वर्षाच्या परीक्षा टप्प्या-टप्पाने घेतल्या जाणार आहेत.