भारतीय जनता पक्षावर सातत्याने तुटून पडणा-या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आज वेगळेच रुप पाहायला मिळाले.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपण गोपीनाथ मुंडे यांचे पट्टशिष्य असल्याचं सांगितलं. पंकजा मुंडे यांचा मी गुरूबंधू आहे, असं सांगायला ते विसरले नाहीत.

पंकजा मुंडे यांचे काैतुक
गोपीनाथ मुंडे हे राज्यातले भाजपचे सर्वोच्च नेते होते. आता जे कुणी ओबीसी नेते सर्वंच पक्षात स्वत:ला मोठं म्हणून घेतात, त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष पाहिलेला आहे. पंकजा त्यांचाच वारसा सांगत असतात.

आज तोच धागा पकडत वडेट्टीवार यांनी पंकजांना गुरुबंधू म्हटलं. वडेट्टीवार म्हणाले,-पंकजा ताई ह्या आमच्या ताई आहेत. ज्यांना मी गुरू मानतो.

मानत होतो, माझे गुरू, ज्यांनी मला ओबीसी चळवळीची दिशा दिली. खरं तर मी मुंडे यांचा शिष्य. मुंडे साहेबांच्या कन्या म्हणजे आम्ही गुरुबंधू. पंकजा ताई हा तोच वसा ओबीसी चळवळीत काम करून पुढे चालवत आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवारांनी जिकलं मन
लोणावळ्यातील ओबीसींची परिषदेत सर्व पक्षाते ओबीसीचे नेते एकत्र आलेले आहेत. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजप नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्रं लोणावळ्यात पाहायला मिळालं. नेत्यांच्या भाषणातखरं मन जिंकलं ते वडेट्टीवारांनी. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून समोर मनातली खदखद बोलून दाखवली. सोबत विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही साद घातली.

वडेट्टीवारांची खदखद
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांच्यासमोरच वडेट्टीवारांची खदखद बाहेर पडली. राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, सत्ता आली, त्यावेळी महसूल मंत्रिपद तरी मिळेल असं वाटलं होतं; पण केवळ ओबीसी म्हणून मला ओबीसी खातं मिळालं.

पंकजा मुंडेंनाही ग्रामीण विकास मंत्रीपद मिळालं असं वडेट्टीवार म्हणाले. म्हणजेच आपण फक्त ओबीसी आहोत, म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात असा दावा वडेट्टीवार यांनी केला.