शरद पवारांचा आम्ही आदर करतो. त्यांना मी कधीच काही बोललो नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं, असं मी अपेक्षित करणार नाही.
कारण, ते आमचे आदरणीय आहेत, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार महान नेते!
नाना पटोले यांनी नुकतेच आघाडी सरकारच्या अनुषंगाने पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचे म्हटले होते. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ते म्हणाले, ‘‘या गोष्टीत मी पडत नाही.
ती लहान माणसं आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,’. यावर समाज माध्यमांना पुन्हा प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी ‘शरद पवार महान आहेत’, असं म्हटलं.
पटोले यांचा स्वबळाचा नारा
पटोले यांनी सातत्याने स्वबळाचा नारा दिला आहे. लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना त्यांनी पाठीत सुरा खुपसला जात असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी थेटपणे राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चांना वेग आला होता.
काय म्हणाले होते पटोले ?
लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. हे दोघे आपल्यावर पाळत ठेवून आहेत. ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेलं का खुपतं?
असा सवाल त्यांनी केला होता. तसेच त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुण्याचे पालकमंत्री आमचं काम करत नाहीत. त्यामुळे पुढील पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल अशी शपथ घ्या, असं ते म्हणाले.