Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

बिल्डरवर कारवाई न केल्यास मानवी हक्क आयोगाकडे दाद मागूः ॲड. आंबेडकर

पावसाळ्यात कुणालाही बेघर करायचं नाही असे निर्देश असतानाही आंबील ओढ्यानजीकची घरे पाडली.

बिल्डरच्या सांगण्यानुसार ही मोहीम राबविण्यात आल्याने त्याच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा पोलिस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

वंचित आघाडी आक्रमत

पुण्यातील आंबील ओढा परिसरातील नागरिकांची अनेक घरं जमीनदोस्त केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. स्थानिकांच्या मदतीनं वंचित बहुजन आघाडीनं महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर संध्याकाळी ॲड. आंबेडकर यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली.

बेकायदेशीर कारवाईला पोलिस बंदोबस्त कसा?

महापालिका प्रशासनाने अतिक्रमण पाडण्याचा कुठलाही आदेश दिला नव्हता. पर्यावरण विभागाचं ना हरकत प्रमाणपत्रही घेण्यात आलं नव्हतं.

जून, जुलैमध्ये कारवाई करू नये, असे न्यायालयाचे आदेश असताना पोलिसांनी कारवाईला संरक्षण कसं दिलं? असा सवाल त्यांनी केला.

गृहमंत्री यात काही कारवाई करतील असं वाटत नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

आंबील ओढ्याचा वाद काय?

कात्रज तलावापासून आंबील ओढ्याला सुरुवात होते. आंबील ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे.

ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे.

नैसर्गिक प्रवाह बंद

आंबिल ओढ्यामध्ये भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरुन नुकसान होते.

प्रशासनाकडून वारंवार नाले बुजवले जातात, पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ बुजवले जात आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची वहनक्षमता 60 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे.

Leave a comment