Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अंगावर याल, तर हिशेब चुकता करू !

मुंबई : शिवसेनचा आज वर्धापन दिन. एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा एका वृत्तपत्राने सुरू केली असताना शिवसेनेने मात्र अंगावर याल, तर हिशेबही चुकता करू, असा इशारा भाजपला दिला आहे.

शिवसेनेला नाही सत्तेचा ऊतमात

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या अग्रलेखातून सध्याच्या सत्तेतल्या शिवसेनेवर आणि इथून पुढच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे; पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला,

ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना; पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’ चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाही, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.

जनतेच्या हृदयावर राज्य

शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती 55 वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री साधणार व्हिडिओ काॅन्फरसद्वारे संवाद

शिवसेनेचा वर्धापनदिन म्हणजे उत्साह, बुलंद गर्जना आणि प्रचंड गर्दी असा एकंदरीत थाटमाट असतो. पण ‘कोरोना’ महामारीने या सगळ्यांवर सलग दुसऱ्या वर्षीही पाणी ओतले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

शिवसेना सेवा धर्माला जागते

शिवसेना या संकटकाळात आपल्या सेवाधर्माला जागते आहे. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या मंत्राला शिवसैनिक जागत आहेत. राजकारण, मतभेद चुलीत टाकून महाराष्ट्रासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचीच गरज आहे, असे या अग्रलेखात म्हटले.

Leave a comment