कोरोनाचा धोका असल्याने सरकारने वारी सोहळा एसटीने नेण्याचा आदेश काढला आहे; परंतु भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी आळंदीतून पायी वारी काढण्याचा इशारा दिला आहे. या इशा-याला आळंदीच्या नागरिकांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

सुनावले खडे बोल

यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे आषाढी वारी सोहळा बसने पंढरपूरला जाणार आहे. त्याबाबत राज्य शासनाने आदेशही जारी केला आहे; मात्र असे असतानाही हा वारी सोहळा परंपरेनुसार पायी झाला पाहिजे, अशी मागणी करणाऱ्यांना आळंदीतील ग्रामस्थांनी खडेबोल सुनावले आहेत.

आळंदीत येऊन जर कोणी संत परंपरेला गालबोट लावणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आळंदीकर ग्रामस्थांनी मांडली आहे.

Advertisement

खबरदारी म्हणून वारी लालपरीतून

आषाढीला माउलींच्या तसेच तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पायीवारी करणारे लाखो वारकरी आहेत; मात्र गेल्या वर्षभरापासून देशावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून माउलींची वारी लालपरीतून होणार आहे.

वास्तविक कोविडचा धोका लक्षात घेऊन आळंदीतील स्थानिक ग्रामस्थांनीही यंदाची वारी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत करण्याची मागणी केली होती.

तसेच पुणे जिल्ह्याबाहेरील वारीच्या ठिकाणच्या गावांनी पायीवारीला विरोध दर्शवत पायी वारी नकोच अशी स्पष्ट सूचना मांडली आहे. त्यानुसार शासनानेही यंदाची वारी गतवर्षीप्रमाणे साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement

विरोधी भूमिका घेणा-यांनवा ठणकावले

दरम्यान, यंदाची आषाढी वारी परंपरेनुसारच व्हावी अशी मागणी ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. बंडातात्या कराडकर तसेच काही ठराविक वारकरी संघटना व भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून केली जात आहे.

व्यसनमुक्तीचे मावळे व काही वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आळंदीत प्रवेश करणार आहे, असे बंडातात्यांनी म्हटले आहे. या विरोधात आळंदीकर ग्रामस्थांनी एकत्र येऊन खडेबोल सुनावले आहेत.

आळंदीकर ग्रामस्थ म्हणून प्रस्थान सोहळ्याला देवस्थानचे निमंत्रित केलेल्या वारकऱ्यांचे आम्ही स्वागत करू; मात्र विरोधी भूमिका घेणाऱ्यांना आळंदीकर खपवून घेणार नाही असे ठणकावून सांगितले आहे.

Advertisement