पश्चिम महाराष्ट्रात कोसळत असलेला पाऊस आणि महापूर याचा परिणाम मुंबईच्या दूध पुरवठ्यावर होत आहे.

मुंबईला येणारे दूध कमी झाले असून, पावसाची स्थिती अशीच राहिली, तर दूध वितरण यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे.

दुधाची आवक खंडीत होण्याची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे दुधाची आवक खंडित होण्याची भीती आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण येथे आलेल्या पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलन आणि वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

Advertisement

दूध विक्रेत्यांकडे एका दिवसाचा दुधाचा साठा असला, तरी पूरस्थिती, पाऊस कायम राहिल्यास आणि वाहतूक पूर्वपदावर न आल्यास दूधाचा पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गोकुळच्या दूध संकलनात काहीशी घट

कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघ आणि गुजरातमधील अमूलकडून साधारण 22 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. शिवाय सांगली-सातारा येथून इतरही काही दूध संघांकडून मुंबईला दूध पुरवठा होतो.

सध्या कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पूरस्थिती गंभीर असून अनेक महामार्ग, रस्ते बंद आहेत. या भागांतील गोठ्यांवरही पुराचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गोकुळच्या दूध संकलनात काहीशी घट झाली आहे.

Advertisement

मराठवाड्यातील दूध कमी

मराठवाड्यातून तसेच नगरसह अन्य काही जिल्ह्यातून महानंदाचे दूध मुंबईत येते. ते मुंबई, ठाणे आणि उपनगरांची गरज पूर्ण करण्याएवढे असल्याचे दिसत नाही.

कर्नाटकाला जोडणारे अनेक मार्गही सध्या बंद झाले आहेत. त्यामुळे तेथून येणाऱ्या दीड ते दोन लाख लिटर दुधाची वाहतूक कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Advertisement