बारामती – केंद्र सरकारने (central government) अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला असून, केंद्राच्या या निर्णयाला बारामती (baramati) मर्चंट असोसिएशने विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी भारत बंदची आयोजन केले आहे. दि बारामती मर्चंट असोसिएशन या बंदमध्ये सहभागी होणार असून उद्या शनिवार (दि. 16) रोजी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे (baramati krushi utpanna bazar samiti) आवारातील बाजार बंद ठेवणार आहे.

अशी माहिती दि बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल शहा यांनी दिली आहे. पाच टक्के जीएसटी वाढीचा निर्णयशेतकरी व्यापारी व ग्राहकांच्या हिताचा नाही त्यामुळे हा निर्णय रद्द व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5 टक्के जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतला आहे.

सदरबाबतचे नोटीफिकेशन (दि. 13) जुलै रोजी काढले असून (दि. 18) जुलै पासून लागू होणार आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे

त्याचा मोठा परिणाम आपल्या व्यापारावर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामध्ये अन्नधान्य, गुळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे.

दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी व्यापारी तसेच ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच अन्नधान्याला पाच टक्के जीएसटी सुरू केल्याने. सर्वांचेच गणित कोलमडणार आहे.