Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

क्षेत्रफळाच्या बाबतीत पुण्यानं मुंबईला टाकलं मागं

राज्यात क्षेत्रफळाच्या बाबतीत मुंबई महापालिका सर्वांत मोठी होती; परंतु तो बहुमान आता पुण्यानं पटकावला आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश झाल्यानं क्षेत्रफळाच्या बाबतीत पुणे महापालिका राज्यात सर्वांत मोठी झाली आहे.

किती आहे क्षेत्रफळ ?

महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यासंदर्भातली अधिसूचना अखेरीस राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने काढली.

त्यामुळे सर्वाधिक क्षेत्रफळाचे शहर म्हणून पुण्याने मुंबईलाही मागे टाकले असून, पुणे हे आता राज्यातील सर्वांत मोठे शहर बनले आहे. मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ चौरस किलोमीटर असून, पुण्याचे क्षेत्रफळ तब्बल ५१८.१६ चौरस किलोमीटर झाले आहे.

नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीची समीकरणे कितपत बदलणार याची आता उत्सुकता आहे.

सहा वर्षानंतर गावे महापालिकेत

पुणे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ३४ गावे पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला.

२०१४ मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर गावे समाविष्ट करून घेण्यास उशीर लागत असल्यामुळे ग्रामस्थ न्यायालयात गेले होते. त्यानंतर २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला.

२०२० सालापर्यंत ३४ गावे समाविष्ट करून घेण्याबाबत राज्य सरकारने न्यायालयात शपथपत्र दिले होते. राज्य शासनातर्फे अखेर ही अधिसूचना काढण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांवर द्यावा लागेल भर

या गावांच्या समावेशानंतर येथील पायाभूत सुविधांवर पालिकेला काम करावे लागणार आहे. पाणी, मलनिस्सारण, शिक्षण आदी सुविधा उभारताना त्यासाठी मोठी आर्थिक तरतूदही करावी लागणार आहे.

या गावांमधील अंदाजे लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे. यातील बहुतांश गावांचा विकास आराखडा तयार झालेला आहे. या आराखड्याला अद्याप राज्य शासनाची मान्यता मिळालेली नाही.

आता या गावांचा नवीन स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाणार, की ‘पीएमआरडीए’चाच आराखडा लागू होणार का, याबाबत अस्पष्टता आहे.

 

Leave a comment