कोरोना आणि टाळेबंदीमुळे आलेल्या निर्बंधाने एसटी महामंडळाला फटका बसला होता. दरम्यानच्या कालावधीत प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीला परवानगी मिळाली.

या माध्यमातून वल्लभनगर आगाराने जून २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत ३९२ फेऱ्यांच्या माध्यमातून २६ लाख ४० हजार ८६४ रुपये इतके उत्पन्न मिळविले.

इतर दैनंदिन खर्चाला हातभार

बसमधील आसने काढून मालवाहतुकीसाठी योग्य होईल असे रूपांतर केले आहे. या मालवाहतूक सेवेचा लाभ शेतकऱ्यांपासून, शासकीय, निमशासकीय, लघु व मोठ्या कंपन्या घेत आहेत. परिणामी, आगाराला कर्मचाऱ्यांचे पगार व इतर दैनंदिन खर्चाला हातभार लागला आहे.

Advertisement

सेवा २४ तास ‘डोअर टू डोअर’

मालाच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी प्रवासादरम्यान घेतली जाते. ही सेवा २४ तास ‘डोअर टू डोअर’ सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर दिली जात आहे, असे एसटी प्रशासनाने सांगितले.

माल पोचल्यानंतर गाडी जास्तीत जास्त चार तासांच्या आत खाली केली जाते. जास्त वेळ लागल्यास २०० रुपये प्रतितास याप्रमाणे अतिरिक्त कर आकारण्यात येतो.

खोळंबा झाल्यास जास्तीत जास्त प्रति दिवस १२०० रुपयेप्रमाणे चार्ज आकारण्यात येतो. आमची मालवाहतूक सुरक्षित असल्याने या सेवेला प्रतिसाद मिळत आहे, असे वल्लभनगरचे स्थानकप्रमुख गोविंद जाधव यांनी सांगितले.

Advertisement