कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागल्यानंतर सरकारनं काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याचा अनुकूल परिणाम उद्योग जगतावर झाला आहे. उद्योगांच्या केलेल्या सर्वेक्षणात उत्पादन पातळी थोडी वाढली असली, तरी कोरोनापूर्व काळात यायला बराच कालावधी लागू शकतो.

उत्पादनात तीन टक्के वाढ

जिल्ह्यातील उद्योगांच्या उत्पादन पातळीत जून महिन्यात थोडीशी वाढ निदर्शनास येत आहे. एप्रिल-मे महिन्यांत ७० टक्क्यांवर घसरलेली उत्पादन पातळी जून महिन्यात ७३ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे निरीक्षण कंपन्यांकडून नोंदविण्यात येत आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) संस्थेच्या ताज्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

Advertisement

एप्रिल-मे महिन्यांच्या तुलनेत जून महिन्यात उत्पादन पातळीत तीन टक्क्यांची वाढ झाल्याचे सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांनी सांगितले.

मनुष्यबळात सात टक्के वाढ

कोरोनाबाधितांचा दर आटोक्यात आल्यावर सरकारने काही सेवा उद्योगांना कामकाजास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्योगात कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. एप्रिल-मे महिन्यांत उद्योगांत कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाण ७० टक्के होते, ते जूनमध्ये ७७ टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे कंपन्यांनी सांगितले.

१५ वे सर्वेक्षण

कोरोनाकाळात ‘एमसीसीआयए’ने केलेले हे पंधरावे सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

त्यात २० टक्के सूक्ष्म, २६ टक्के लघु, २३ टक्के मध्यम व ३१ टक्के मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी ६६ टक्के कंपन्या उत्पादन क्षेत्रातील, १७ टक्के कंपन्या सेवा क्षेत्रातील; तर उर्वरित कंपन्या दोन्ही क्षेत्रांत कार्यरत आहेत.

फेब्रुवारी-मार्चच्या तुलनेत वाढ कमीच

जिल्ह्यातील उद्योगांच्या उत्पादन पातळीत व कार्यरत मनुष्यबळाच्या प्रमाणात जून महिन्यात सकारात्मक वाढ दिसत असली, तरी ती फेब्रुवारी-मार्च महिन्यांच्या तुलनेत कमी आहे. एमसीसीआयए’च्या सर्वेक्षणानुसार, फेब्रुवारी-मार्च महिन्यांत उत्पादन पातळी ८३-८५ टक्के होती; तर कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाण ८६ टक्के होते.

उत्पादन करोनापूर्व पातळीवर कधी येईल?

सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांना त्यांचे उत्पादन जानेवारी २०२० या कोरोनापूर्व पातळीवर कधी येईल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर २३ टक्के कंपन्यांनी आपल्या उत्पादनाने कोरोनापूर्व पातळी गाठल्याचे सांगितले.

Advertisement

५४ टक्के कंपन्यांनी कोरोनापूर्व उत्पादनाची पातळी गाठण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगितले. २४ टक्के कंपन्यांनी ही पातळी गाठण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल, असे सांगितले.

 

Advertisement