Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ

मुंबई : चकमक फेम अशी ओळख असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

१२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणी शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत संतोष शेलार, आनंद जाधवलाही १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांआधी प्रदीप शर्मा यांची एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या अनुषंगाने शर्मा यांनी वकिलास भेटण्याची परवानगी मागितली असता त्यांना कोर्टाकडून दिलासा देण्यात आला होता; पण त्यांनतर आता कोर्टाकडून १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

वकिलाला भेटायला परवानगी

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन हत्या प्रकरणी शर्मा यांना अटक करण्यात आली. एनआयए कोर्टाने त्यांना २८ जूनपर्यंत कोठडी दिली होती.

यामध्ये आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, वकिलास भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून शर्मा यांनी एनआयए कोर्टात अर्ज सादर केला होता. यावर सुनावणी झाली असता कोर्टाने शर्मा यांना दिलासा दिला.

प्रदीप शर्मा त्यांच्या वकिलांना दररोज दुपारी १२ ते १२.२० या वेळेत भेटू शकतात, असे परवानगी देताना कोर्टाकडून देण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती. ही बाब उघड झाल्यानंतर हे प्रकरण नाट्यमय वळणे घेत आहे. त्यात स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरनची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं.

सचिन वाझे यांच्यासह गुन्हे शाखेतील त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढतच चालली आहे. १८ जून रोजी याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली.

हिरन हत्येप्रकरणात शर्मा हे मास्टरमाइंड असल्याचा संशय एनआयएला असून ठोस पुरावे हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a comment