पुणे – ऐन सणासुदीच्या दरम्यान इंदापूर तालुक्यात एक खळबजनक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूर तालुक्यात जमिनीच्या वादातून एका चार वर्षांच्या मुलाची हत्या (Indapur Murder News) करण्यात आली आहे. विकत घेतलेली जमीन परत देण्यासाठी वादावादी करून अंगणात बसलेल्या चार वर्षाच्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर (tractor) घालून त्याचा खून केला आहे. ही धक्कदायक घटना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी (Sarasewadi, Indapur) येथे घडली आहे.

अबुजर जब्बार शेख (वय 4) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी जब्बार गफुर शेख (वय 36, रा. सरडेवाडी, जाधवपाटी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरुन पोलिसांनी जयप्रकाश नरहरी देवकाते (रा. सरडेवाडी, जाधववस्ती, ता. इंदापूर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जयप्रकाश देवकाते याने जब्बार गफूर शेख यांच्या मुलगा अबुजर शेख (वय 4 वर्ष 2 महिने) याच्या अंगावर ट्रॅक्टर घातला.

या ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच 12 एफ 1248 होता. आधीच असलेल्या जमीन व्यवहाराच्या भांडणातून जयप्रकाश याने आपल्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर (Murder) घातल्याचा आरोप जब्बार यांनी केलाय.

मिळालेल्या माहिती नुसार, “जब्बार शेख यांनी 2022 मध्ये जयप्रकाश देवकाते यांच्याकडून 4 आर जमीन नोटरी करार करून विकत घेतली. त्याठिकाणी ते 2021 मध्ये कुटुंबासह राहण्यास गेले.

तेव्हा जयप्रकाश देवकाते याने तुम्ही घेतलेली जमीन परत दे, नाही तर मी तुझ्या कुटुंबाला बघून घेतो, अशी धमकी दिली. तेव्हा फिर्यादीने जमीन परत देतो, घेतलेले पैसे परत कर, असे सांगितले. त्याला तो तयार नव्हता.

24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याने जमिनीवरून फिर्यादीशी वाद घातला. तेे मंगळवारी सकाळी घरातील खोलीमध्ये चहा घेत होते. तर त्यांचा 4 वर्षाचा मुलगा अबुजर शेख हा पडवीत चहा व बटर खात होता.

तेव्हा जयप्रकाश देवकाते हा ट्रॅक्टर घेऊन त्यांच्या अंगणात आला व त्याने मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. ट्रॅक्टरचा आवाज ऐकून बाहेर आले असता त्यांचा मुलगा जखमी झालेला दिसला.

देवकाते हा ट्रॅक्टर घेऊन तेथून निघून गेला व मोकळ्या शेतात लावून तो तेथून पळून गेला. मात्र, इंदापूर पोलिसांनी आता आरोपीला अटक केली असून, सध्या त्याची कसून तौकशी केली जाते आहे.