घाटकोपर बाँबस्फोटातील कथित आरोपी ख्वाजा युनुस याच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणी दाखल दाव्याची सुनावणी पुन्हा सुरू होण्याचे संकेत सत्र न्यायालयाने दिले आहेत.

या खटल्यातील विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्ती बाबतचा सविस्तर तपशील पोलिस उपायुक्तांनी व्यक्तिशः हजर राहून द्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.

पोलिस उपायुक्तांना कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश

राज्य सरकारने 2018 मध्ये या खटल्यातील विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती रद्द केली होती. त्यानंतर आजपर्यंत या प्रकरणात सरकारी वकील नियुक्त करण्यात आलेला नाही.

Advertisement

यावर न्यायालयात सुनावणी झाली. सीबीडी बेलापूरच्या सीआयडी पोलिस उपायुक्तांनी सर्व माहिती आणि कागदपत्रे घेऊन न्यायालयात हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

वाझेची व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे सुनावणी

आरोपी वाझेलादेखील पुढील सुनावणीमध्ये व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे हजर करावे असे आदेश न्यायालयाने दिले.

वाझे सध्या एनआयए कोठडीत तळोजा कारागृहात आहे. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तो आरोपी आहे.

Advertisement

युनुसच्या आईने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेल्या आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. या याचिकांचा तपशील दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

पोलिस मारहाणीत मृत्यूचा संशय

परभणीत राहणारा युनुस साॅफ्टवेअर अभियंता होता. पोलिसांनी त्याला घाटकोपर बाँम्बस्फोट प्रकरणात 2002 मध्ये अटक केली होती.

जानेवारी 2003 मध्ये त्याला सह आरोपींनी शेवटचे पाहिले होते आणि पोलिसांनी त्याला बेदम मारले होते, अशी माहिती सहआरोपींनी दिली आहे.

Advertisement

तो पोलिस कोठडीतून पळाला होता, असा दावा वाझेने केला होता;’ मात्र त्याचा मृत्यू कोठडीत असताना झाला असा गुन्हा पोलिसांनी वाझेसह चारजणांवर दाखल केला आहे. वाझेला पुन्हा सेवेत घेतल्यानंतर युनुसच्या आईने उच्च न्यायालयात याचिका केली होती.

 

Advertisement