गुंडाविरोधी पथकाने केलेल्या कारवाईचा पाठपुरावा करत वाकड पोलिसांनी अँटी फंगल या साथीच्या आजारावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून एक लाख ४४ हजार रुपये किमतीचे तब्बल २२ इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

शरणबसवेश्वर सिद्धेश्वर ढमामे (वय ३८, रा. विजापूर रोड, सोलापूर), राजशेखर कासाप्पा भजंत्री (३३, रा. गुलबर्गा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अँटी फंगल इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.

या आरोपींना पुढील तपासासाठी वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आरोपींच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करत असताना ढमामे याचा गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूर येथून अटक केली. पुढील तपासात औषधांचा अवैध पुरवठा गुलबर्गा येथून होत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी गुलबर्गा येथे सापळा लावून भजंत्री याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून लिपोसोमल अँफोटेरीसिन इंजेक्शनचे १४ तर अँफोटेरीसिन बी लिपोसोम इंजेक्शनचे ८ नग, असा एकूण एक लाख ४४ हजारांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला. आरोपी भजंत्री हा गुलबर्गा इ्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गुलबर्गा या शासकीय रुग्णालयात कोविड तसेच म्युकरमायकोसिस विभागात नसिंर्ग स्टाफ आहे.

त्यामुळे या प्रकरणात मेडिकल कॉलेजमधील आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे. तसेच आरोपींनी सोलापूर येथे देखील काही औषधे विकली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पुणे शहरातही काही इंजेक्शन विकले आहेत का, याबाबत तपास सुरू आहे.