काही ठराविक चुकीच्या लोकामुळं सहकाराला दोष देणं चुकीचं

सहकार चळवळ महाराष्ट्रात रुजली गेली आणि महाराष्ट्रातच वाढली आहे. या क्षेत्रात काही चुकीचे लोक आहेत; पण काही चुकीच्या लोकांमुळे संपूर्ण सहकार क्षेत्र चुकीचं आहे, असं समजण्याचं अजिबात कारण नाही,” असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी व्यक्त केलं.

सहकार राज्याचा विषय

सहकार विभाग हा राज्याच्या अखत्यारितील विभाग आहे. राज्यानेच त्याबद्दल पाहावं. केंद्राच्या हातात मल्टिस्टेट सोसायट्या, मल्टिस्टेट कारखाने, बँका असतात. त्याचा कारभार केंद्राने पाहावा, असा सल्ला त्यांनी दिला.

‘केंद्राने केंद्राचं पाहावं, राज्याने राज्याचं पाहावं’

“केंद्र सरकारने काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. सहकार क्षेत्र शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं आहे. सहकार क्षेत्राशिवाय प्रत्येक राज्याने आपापले नियम लावले आहेत. खरंतर केंद्रानं केंद्राचं काम करावं.

राज्याला राज्याचं काम करू द्यावं. जसं संरक्षण विभाग हे केंद्राच्याच हातात पाहिजे. आम्ही त्याचं वेगळं खातं सुरू करू शकत नाहीत. तशाप्रकारे त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे,” असं पवार म्हणाले.

केंद्राचा उद्देश नियमानंतरच कळेल

सहकार खातं सुरू करण्यामागे त्यांचा हेतू काय, त्यामागे वेगवेगळे कंगोरे असू शकतात. त्यातून ते काय करू पाहत आहेत ते त्याबाबतचे नियम बनवल्यानंतरच कळेल.

मध्यंतरी शेतकऱ्यांविरोधातील कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर आठ महिन्यांपासून देशातील शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे.

शेतकऱ्यांचं आजही आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत. आम्ही त्या संदर्भात तीन बिलं आणली आहेत. जनतेच्या सूचनांसाठी ती बिलं ठेवलेली आहेत, माहिती त्यांनी दिली.