वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रासह पर्यटनस्थळ गाठले; परंतु तरुणाचा तो वाढदिवस अखेरचा ठरला. वाढदिवस असलेल्या तरुणासह त्याच्या मित्राचाही बुडून मृत्यू झाला.

ही आहेत बुडालेल्यांची नावं

स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रासोबत लोणावळा इथं आलेल्या तरुणासह आणखी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

आकाश गुरव (वय-२५), वीरेंद्र त्रिपाठी (वय-२३, दोघेही रा. रूपीनगर, निगडी) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. लोणावळ्याच्या जवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज समोरील एका दगडाच्या खाणीत हे तरुण बुडाले.

Advertisement

पोहण्याचा मोह नडला

आकाश गुरव याचा आज वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी करण्यासाठी तो आणि त्याचे इतर चार मित्र त्यांच्या तीन मोटरसायकलवरून लोणावळ्यात आले.

सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ते सर्व लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजसमोर असलेल्या एका दगडाच्या खाणीकडे गेले होते. त्याठिकाणी गेल्यावर आकाश सोबत आलेले त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.

मित्रांचा सल्लाही धुडकावला

या वेळी आकाश आणि वीरेंद्रही पोहण्यासाठी उतरले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना खोल पाण्यात उतरू नका असे सांगितले होते; मात्र मित्रांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करत दोघेही खोल पाण्यात गेले. पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले.

Advertisement

त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांचीही दमछाक झाल्याने ते बुडू लागले असता, ते कसेबसे बाहेर आले आणि त्यांनी आरडाओरड करून मदतीसाठी प्रयत्न केला; परंतु नागरिक येईपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.

 

Advertisement