मुंबई – गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला केला आहे.

वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus project) आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत.

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार (Shinde-Fadnavis Government) दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का ? असा प्रश्न सध्या पडत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

काय? म्हणाले होते उदय सामंत…

”टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरातील मिहान येथे होत आहे. त्यासाठी, आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. टाटा कोलॅबरेशनसह हा प्रकल्प येत आहे,

त्यामुळे टाटा एव्हीएशनच्या लोकांसाठी आम्हाला बोलावं लागणार आहे,” असे विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं होतं. १५ सप्टेंबर रोजी उदय सामंत यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात हा विश्वास व्यक्त केला होता.