पुणे : जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांनी युद्धकलेचे शिक्षण घेतले, त्यातूनच पुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

या दोघांना मानवंदना देण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांचे शिल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

पुरंदर,सिंहगड नंतर शिवनेरी..

पुणे महापालिकेने पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचे भित्तीशिल्प व झेंडा उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आणखी शिवनेरीवर जिजाऊ व शिवबाचे शिल्प उभारण्याचा निर्णय

घेतल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. महापालिकेतर्फे हे शिल्प उभारण्यात यावे असा प्रस्ताव नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांनी दिला होता. त्यास स्थायीमध्ये मान्यता देण्यात आली.

नगरसेवकांकडून प्रस्ताव

रासने म्हणाले, “महापालिकेतर्फे सिंहगड किल्ल्यावर २०१७ मध्ये तानाजी मालुसरे यांचे भित्तीशिल्प उभारण्यात आले आहे. पुरंदर किल्ल्यावर धर्मवीर संभाजी महाराजांचे शिल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याच धर्तीवर शिवनेरीवर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाचे शिल्प उभारण्यात येणार आहे. नगरसेवकांनी हा प्रस्ताव दिला असल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे.”