पुणे – राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. जामिनावर बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आव्हाड यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. मागील 72 तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतल्याचं दिसून आलं आहे.

आव्हाड यांच्यावर एका महिलेने गैरवर्तन केल्याचा (Molestation) आरोप केला आहे. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एका महिलेला ढकलल्याचा जितेंद्र आव्हाडांचा (Jitendra Awhad) व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून, ते सध्या अडचणीत सापडले आहेत.

पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. या प्रकरणी आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करतोय, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

जयंत पाटील म्हणतात…

“या कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत गर्दीतून वाट काढत असताना आव्हाड यांनी स्वभावाप्रमाणे त्यांचा मार्ग काढला. उलट ते म्हणतायत, तुम्ही गर्दीत कशाला येताय?

यात कुठलीही विनयभंगाची भावना किंवा कृती आहे, असं वाटत नाही. विशेषतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे याचे अर्थ लोकांना काय समजायचे, ते समजतात.

गेल्या काही दिवसांपासून आव्हाड यांच्यावर लक्ष केंद्रीत करून, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी मी त्यांना विनंती करणार आहे. पक्ष त्यांच्याबरोबर ठामपणे उभा आहे. जयंत पाटील (Jayant Patil ) यावेळी म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं…

“पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे.. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत’, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.