Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कंगणाला दिलासा नाहीच

मुंबईः आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं तसंच बेकायेदशीर बांधकामामुळं चर्चेत असलेल्या चित्रपट अभिनेत्री कंगणा राणावतला दिलासा मिळाला नाही. पासपोर्टचे नूतनीकरण अडचणीचे ठरले आहे.

म्हणणे ऐकल्याशिवाय निर्णयास नकार

दोन गुन्ह्यामुळे पासपोर्ट नूतनीकरण अडचणीचे ठरत असल्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणा-या कंगणाला तातडीने दिलासा मिळू शकला नाही.

तक्रारदार व पोलिसांचे म्हणणे ऐकल्याविना आम्ही कोणताही आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्ट करतानाच सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यासंदर्भात मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज करण्याची मुभा न्या. संभाजी शिंदे व न्या. गोविंदा सानप यांच्या खंडपीठाने कंगणाला दिली.

पूर्वीचा अर्ज अस्पष्ट

ट्विटर व सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांबद्दल वांद्रे न्यायालयाने चौकशीचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी कंगणाविरोधात १७ ऑक्टोबर २०२० रोजी देशद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली एफआयआर नोंदवला.

‘माझ्या पासपोर्टची मुदत सप्टेंबर-२०२१मध्ये संपत आहे. व्यावसायिक कामांनिमित्त वारंवार परदेशात जावे लागते; मात्र पासपोर्ट प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी एफआयआरचे कारण देत नूतनीकरणाविषयी असमर्थता दर्शवली’,

असे गाऱ्हाणे मांडत कंगणाने याविषयी अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत तातडीचा अर्ज केला आहे. यापूर्वी अर्ज अस्पष्ट स्वरुपाचा असल्याने आणि पासपोर्ट प्राधिकरणाला प्रतिवादी केले नसल्याने न्यायालयाने तातडीचा दिलासा नाकारला होता.

परदेशी जाता येत नसल्याने चित्रीकरण रखडले

‘धाकड या चित्रपटाचे काही चित्रीकरण हंगेरीमधील बुडापेस्ट येथे करण्याचे वेळापत्रक दीड महिन्यापूर्वीच ठरले आहे; परंतु कंगणाच्या पासपोर्टचे नूतनीकरण रखडल्याने आमचे दररोज १५ लाख रुपयांचे नुकसान होत आहे’, असे म्हणणे निर्मात्यांतर्फे अॅड. हृषीकेश मुंदरगी यांनी मांडले.

तातडीच्या दिलाशाची गरज असल्याचे म्हणणे अॅड. सिद्दिकी यांनी मांडले; मात्र दुसऱ्या प्रकरणाच्या एफआयआर संदर्भातही सुनावणी घ्यावी लागेल आणि आज वेळेअभावी सुनावणी होऊ शकणार नसल्याने ३० जूनला घेऊ, असे संकेत खंडपीठाने दिले.

तेव्हा वकिलांनी सोमवारसाठी आग्रह धरल्याने त्यासंदर्भात मुख्य न्यायमूर्तींकडे अर्जाद्वारे विनंती करण्याची मुभा खंडपीठाने त्यांना दिली.

Leave a comment