पुणे – गेल्या आठवड्यात दीर्घ विश्रांतीनंतर राज्याच्या (maharashtra) बहुतांश भागात मोसमी पाऊस (monsoon) भागात पुढील काही दिवस जोरधारा कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला होता. आणि याच अंदाजानुसार पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पुणे शहर (pune) आणि परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्र (Khadakwasla Dam) शंभर टक्के भरलं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.

जून महिन्यात पुण्यात म्हणावा तेवढा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत घट झाली होती. पाणीपातळी घटल्याने पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले होते.

मात्र जुलै आणि आता ऑगस्टमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळी क्षेत्रातील इतर धरणे टेमघर धरण,

वरसगाव धरण आणि पानशेत धरण ही सुद्धा 96 टक्क्यांच्या वर भरली आहेत. त्यामुळे बुधवारी खडकवासला धरणातून 22809 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

दरम्यान, मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला आणि पानशेत या दोन्ही धरणातून नदीपात्रात करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने मुठा नदी पात्राच्या पाणीपातळीत देखील घट झाली आहे. भिडे पुलावरचं पाणी ओसरलं असून, पुलावरून तुरळक वाहतूकीला सुरुवात झाली आहे.

तर, दुसरीकडे आता पुणे (pune) जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे ही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.