माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चाैधरी यांच्या भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणाची चाैकशी करणा-या न्या. दिनकर झोटिंग समितीच्या अहवालात नेमकं काय आहे, हे शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांना विचारणा केली होती; परंतु हा अहवाल कुठेच सापडत नसल्याचं अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना कळवलं.

त्यामुळे झोटिंग समितीचा अहवाल गेला कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. झोटिंग समितीचा गायब झालेला अहवाल आणि खडसे यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

२०१७ मध्येच अहवाल सादर

भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जून 2017 मध्येच फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

Advertisement

या अहवलात ‘क्लिन चीट’ मिळाल्याचे खडसे सांगत होते. मागच्या सरकारच्या काळातील विधिमंडळाच्या अधिवेशनात हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती; परंतु फडणवीस यांच्या सरकारने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

ईडीचा ससेमिरा

सध्या खडसे ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडीने खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. या प्रकरणी पुन्हा एकदा समन्स पाठवून ईडीकडून खडसे यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?

खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरीत जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आहे. भाजपचं कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतलेल्या खडसे यांनाही ईडीने नोटीस धाडली.

Advertisement

खडसे यांनी पत्नी मंदाकिनी यांच्या नावाने तीन कोटी 75 लाखांना तीन एकर जमिनीचा व्यवहार केला. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करण्यासाठी एक कोटी 37 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरण्यात आली होती.

‘लाचलुचपत’ची खडसे यांना ‘क्लिन चीट’

पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरावे आढळून येत नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान 2019 मध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि अनपेक्षितपणे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली.

भाजपच्या हातून सत्ता जाण्याला आणि पक्षात माझी मुस्कटदाबी करण्याला एकमेव फडणवीस जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत खडसे यांनी कमळ सोडून हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ घेतलं. या प्रवेशाला दोन महिने उलटताच खडसेंना ईडीने नोटीस धाडली होती.

Advertisement