कोरोनामुळे उपासमार होत असलेला कोल्हाटी समाज निर्बंध सैल होताच रस्त्यावर उतरून खेळ करायला लागला आहे.

कला सादर करून उपजीविका

शिक्षण, विकास आणि आधुनिकतेचा स्पर्श न झालेला हा कोल्हाटी समाज रस्त्याच्या कडेला पारंपरिक डोंबारी कला सादर करत नाच व खेळ याचा सुरेख संगम साधत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांसमोर कला सादर करून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करीत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक केलेले निर्बंध प्रशासनाने काही प्रमाणात शिथील केल्याने उपजीविकेसाठी अनेकजण घराबाहेर पडू लागले आहेत.

सात वर्षांच्या मुलीची कसरत थक्क करणारी

आनंदपार्क वडगावशेरी चौकात रस्त्याच्या कडेला डोंबा-याचा खेळ दाखवून येणा-या जाणा-याचे लक्ष वेधून घेत आहे. सात वर्षांची चिमुरडी प्रज्ञा नट (मूळचे छत्तीसगढ).

जमिनीपासून सहा ते सात फुटाच्या अंतरावर बांधलेल्या जाड रस्सीवरून जेव्हा डोक्यावर पितळी कलश, हातात जाड बांबूची काठी आणि त्याच क्षणी पायाने सायकलचे चाक चालवताना पाहून बघणारे थक्क झाले आहेत.

कधी परात पायाच्या अंगठ्यात पकडून रस्सीच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत चालताना पाहून खाली पडेल की काय या भीतीने येणा-या जाणा-यांच्या हृदयाची धडधड वाढते.

कष्टाच्या पैशातून भाकरीचा चंद्र

उद्याची चिंता न करता घाम गाळून कला दाखवत लोकांचे मनोरंजन करून त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातून भाकरीचा चंद्र त्यांच्या ताटात दिसतो, तेव्हा त्यांच्या चेह-यावर समाधान दिसून येते.