file photo

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्यासंदर्भात पाकिस्तान सरकारच्या याचिकेवरील सुनावणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी पाकमधील भारतीय उच्चायुक्ताच्या वकिलाने प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवत एप्रिल २०१७ साली मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले.

पाक लष्कराने एकतर्फी सुनावणी करत जाधव यांना शिक्षा ठोठावली, तसेच त्यांना राजनयिक मदत करू देण्यास देखील नकार दिला, असा आक्षेप भारताने घेतला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताचे हे आक्षेप मान्य केले आणि पाक सरकारला जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले.

Advertisement

जाधव यांना तत्काळ राजनयिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आयसीजेने पाक सरकारला दिले. त्यानुसार इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी आहे.

पाक न्यायालयाने भारताला सुनावणीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे; परंतु जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलाची नियुक्ती करू देण्याची मागणी भारताने केली आहे. पाक सरकारने मात्र स्थानिक वकीलच जाधव यांचा खटला लढेल, अशी भूमिका घेतली आहे.

Advertisement