मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले असून दीदींना संगीत महाविद्यालय स्थापन करण्याची इच्छा होती. परंतु हे स्वप्न दीदींच्या हयातीत पूर्ण झाले नाही.त्यामुळे ही खंत भरून काढण्यासाठी मंगेशकर परिवार (Mangeshkar family) प्रयत्न करत आहे.

मास्टर दिनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar) यांच्या नावे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन व्हावे, अशी लता दीदींची इच्छा होती.

दीदींच्या इच्छेनुसार, राज्य सरकारने तेव्हा मंगेशकर कुटुंबातील सदस्य आणि संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.आता लतादीदी राहिल्या नाहीत.

Advertisement

त्यामुळे आता त्या शासकीय संगीत महाविद्यालयाचे नाव हे दीदींच्या नावासह मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने म्हणजेच ‘भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ या नावाने स्थापन करण्यात यावे, अशी मागणी मंगेशकर कुटुंबियांची आहे.

मंगेशकर कुटुंबियांनी याबाबतची मागणी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना केली आहे. त्यानुसार सरकार हा निर्णय जाहीर करेल, असे मंगेशकर कुटुंबियांनी पत्रात नमूद केले आहे.

तसेच मुंबई विद्यापीठातील (University of Mumbai) अध्यासन केंद्र हे लता दीदींच्या नावाने सुरु करण्यात येत आहे. हा निर्णय कुटुंबियांना विश्वासात न घेता घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचे मंगेशकर कुटुंबियांनी या पत्राद्वारे म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान समितीच्या शिफारसीनुसार मुंबई विद्यापीठात जागेची पाहणी करून जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र दुर्दैव असे की, लता दीदी हयात असताना समितीने निश्चित केलेली जागा उपलब्ध करुन देण्यात आली नाही.

जागा उपलब्ध न झाल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत महाविद्यालयाचं स्वप्न हे दीदींच्या हयातीत पूर्ण झाले नाही. याबाबतची नाराजी मंगेशकर कुटुंबियांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

Advertisement