जंगलात भक्ष्य न राहिल्यानं बिबट्या आतचा भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत यायला लागला आहे. आता तो शहरी भागात दिसायला लागला आहे.
हडपसर परिसरातील साडेसतरा नळी व मांजरी बुद्रुक दरम्यान असलेल्या शेतात बिबट्याने दर्शन दिल्याने खळबळ उडाली आहे.
बिबट्याचे पाहिले ठसे
साडेसतरा नळी येथील प्रमोद गदादे यांच्या शेतामध्ये दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे तेथे काम करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
अनेकांनी बिबट्याचे ठसे पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. वन विभागाचे मधुकर गोडगे यांच्या समवेत आमदार चेतन तुपे यांनी तेथील पाहणी केली.
या वेळी बेबी कालव्याजवळून जाणाऱ्या पायवाटेलगत बिबट्याचे ठसे आढळून आले. ट्रकचालक विलास आगे व कामगार यशवंत म्हस्के यांनी बिबट्या पाहिला.
साधारण दोन-अडीच फूट उंच, तीन फूट लांब बिबट्या उसाच्या शेतात जाताना दिसल्याचे विलास आगे यांनी सांगितले.
पिंजरे लावण्याची मागणी
वन विभागाने बिबट्याचा शोध घ्यावा आणि बिबट्याला पकडण्यासाठी येथे पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ बाळासाहेब तुपे यांनी केली आहे.
‘शेतातील ठसे बिबट्याचेच आहेत. बिबट्याने एका कुत्र्याला ओढून नेल्याचे कामगारांनी पाहिले आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जाईल,’ असे गोडगे यांनी सांगितले.
बिबट्याचा लवकरच शोध
परिसरात दिसलेले ठसे बिबट्याचेच आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वन विभागाला बिबट्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन ठशांची खात्री केली आहे.
लवकरच बिबट्याचा शोध घेतला जाईल. नागरिकांनी रात्रीचे निष्कारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आ. तुपे यांनी केले.