गेल्या वर्षापासून कोरोनामुळं रक्तदान शिबिरांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळं रक्तसंकलन कमी होत आहे. महाविद्यालये बंद असल्याचा परिणामही रक्तसंकलनावर झाला आहे. त्यामुळं आता रक्ताचा तुटवडा झाला आहे.

रक्ताचा मर्यादित साठा

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान शहरात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता, लसीकरणानंतर रक्तदान करण्यासाठी असलेले काही दिवसांचे निर्बंध, कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, लोकलसेवा बंद असणे अशा विविध कारणांमुळे रक्तदात्यांचा ओघ कमी होऊन पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे नोंद झालेल्या रक्तसाठ्यामध्ये केईएम रुग्णालयामध्ये ३४, सेंट जॉर्ज रुग्णालयात ३६, जेजे रुगणालयात ४४, जीटी रुग्णालयामध्ये ७, रेड क्रॉसमध्ये शून्य, संत निरंकारी रक्तपेढीमध्ये १६ (यात सर्व रक्त ओ पॉझिटिव्ह गटाचे असून ए, बी वा एबी पॉझिटिव्ह रक्ताची उपलब्धता नव्हती.) बीडीबीए/शताब्दीमध्ये रक्ताच्या २५ पिशव्या उपलब्ध होत्या.

Advertisement

रक्तदान मोहिमेला खीळ

कोरोना संसर्गाच्या काळामध्ये रक्तदान मोहिमेला मोठ्या प्रमाणात खीळ लागली. आरोग्यमंत्र्यांसह सामाजिक संस्था, आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात काम करणारे कार्यकर्ते, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या आरोग्यदूतांनी आवाहन केल्यानंतर रक्तदान मोहीम सुरळीत झाली होती; मात्र त्या वेळी रक्ताची उपलब्धता इतकी होती, की मुदत उलटून गेल्यानंतर काही पिशव्या रक्त वाया गेले.

रक्त संकलनामध्ये नियोजन नसल्यामुळे सातत्याने या अडचणी उद्भवत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे.

तज्ज्ञांचे आवाहन

कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांवरील प्रलंबित शस्त्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. प्रसूती, अपघात, प्रलंबित शस्त्रक्रियांसाठी रक्ताची तातडीची निकड भासू शकते त्यामुळे या रक्ताच्या उपलब्धतेसाठी दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

Advertisement