‘भाजपने काहीही सांगितले, तरी महाविकास आघाडीसोबत राहण्यातच शिवसेनेचे भले आहे. भाजपसोबत राहून तुम्हाला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपदही मिळाले नाही; मात्र या सरकारमध्येच ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षे पूर्ण करू शकतील,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना नेत्यांना दिला.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गोपनीय बैठक

महाविकास आघाडी सरकार स्थिर राहावे, यासाठी पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गोपनीय बैठक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापनेचा विचार असल्यास तसे घडू नये, यासाठी बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.

Advertisement

बैठकांमागून बैठका

मोदी आणि ठाकरे यांच्यात आठ जून रोजी दिल्लीमध्ये अर्धा तास भेट झाली. त्यामुळे भविष्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला डच्चू देऊन भाजपसोबत सरकार स्थापन करील का, याविषयी चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. त्याच दरम्यान ‘राष्ट्रवादी’चे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानीही पक्षनेत्यांमध्ये बैठक झाली.

त्यानंतर लगेचच त्याच रात्री ९ ते ११ दरम्यान मुंबईतील पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ही गोपनीय बैठक झाली.

Advertisement

या बैठकीला पवार, खासदार सुनील तटकरे; तर शिवसेनेकडून शिंदे, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

यातच आपले भले

‘ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी असली; तरीही सध्याच्या सरकारमध्येच राष्ट्रवादी व शिवसेनेचे भले आहे.

हे सरकार पडले आणि पुन्हा भाजपला सत्ता मिळाली, तर सगळी समीकरणे बिघडतील, असा सूर या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी लावला होता,’ असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Advertisement