भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला देऊन राज्याच्या महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण करण्याचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरंदरच्या काँग्रेसच्या आमदारांविरोधात तक्रार केली आहे.

शिवतारेंचे आरोप गंभीर

सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली असतानाच शिवतारे यांनी काँग्रेस आमदारावर टीकास्त्र सोडलं आहे. या पत्रात शिवतारेंनी गंभीर आरोप केले आहेत. शिवतारे यांनी पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार संजय जगताप यांच्यावर श्रेयवादाचा आरोप केला आहे.

विजय शिवतारे यांच्या पत्रात काय ?

पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या उद्घाटनावरुन शिवतारे यांनी काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यमंत्रिपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले.

Advertisement

मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली आहे; मात्र या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जात आहे.

तोंडल येथे काम सुरू केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते, असा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला आहे.

ठाकरे -पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन व्हावे

या कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल, अशी मागणीही शिवतारे यांनी पत्रातून केली आहे.

Advertisement