तंत्रज्ञान माणसाला अधिक उपयुक्त ठरत असून वेळ, श्रम, पैसा वाचविण्यास उपयुक्त ठरत आहे. त्याचबरोबर गैरव्यवहार, दलाली रोखण्यासही नवं तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.

आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज राहिलेली नाही. आरटीओबाबतही आता तसंच होणार आहे.

दोन महिन्यात ऑनलाईन सेवा

वाहन चालविण्याच्या लायसन्सची दुय्यम प्रत (डुप्लीकेट) आणि लायसन्स नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्याची प्रक्रिया परिवहन आयुक्त कार्यालयाने सुरू केली आहे.

Advertisement

येत्या दोन महिन्यांत ही सेवा कार्यान्वित होईल. घरबसल्याही लायसन्सचे ते नूतनीकरण करू शकतील.

पक्के लायसन्स हरविल्यास किंवा पत्ता बदललेल्या पत्त्याची नोंद करण्यासाठी नागरिकांना दुय्यम प्रत आवश्यक ठरते; मात्र लायसन्स हरविल्यास त्याची दुय्यम प्रत मिळविण्यासाठी नागरिकांना पोलिसांकडे तक्रार करावी लागते.

त्या तक्रारीची प्रत, जुन्या लायसन्सची झेरॉक्स आणि वैयक्तिक तपशीलाची कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे सध्या ऑनलाईन पद्धतीने परिवहनच्या संकेतस्थळावर अपलोड केली तरी, त्यांची प्रिंटआऊट स्थानिक ‘आरटीओ’ कार्यालयात जाऊन जमा करावी लागते.

Advertisement

त्यानंतर नागरिकांना डुप्लिकेट लायसन्स घरपोच मिळते. तसेच लायसन्सच्या नूतनीकरणाबाबतही आहे.

आधार कार्डशी मोबाईल संलग्न

ऑनलाईन कागदपत्रे दिली, तरी प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जावेच लागते. त्यात हस्तक्षेप करण्यासाठी एजंटांना वाव होता. यामुळे आरटीओ कार्यालयांवर ताण येत होता.

त्याची दखल घेऊन परिवहन आयुक्त कार्यालयाने ही दोन्ही कामे आता ऑनलाईन पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडून (एनआयसी) त्या बाबत सध्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यावर या योजनेची अंमलबजावणी होईल.

Advertisement

डुप्लिकेट लायसन्स किंवा लायसन्सचे नूतनीकरण ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित वाहनचालकाच्या आधार कार्डला त्याचा मोबाईल क्रमांक लिंक करावा लागेल.

अन्यथा त्यांना ही सुविधा ऑनलाईन पद्धतीने मिळणार नाही. ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड केल्यावर वाहनचालकाच्या मोबाईलवर ‘ओटीपी’ येईल. तो वेबसाईटवर समाविष्ट केल्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Advertisement