Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या विद्यार्थ्यांवर कोसळली वीज

कोरोनामुळे वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यावर आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय काढण्यात आला; परंतु त्याच्या मर्यादा स्पष्ट होत असतानाच हे शिक्षण आता जीवावर बेतते. अशा प्रकारची घटना डहाणू तालुक्यात घडली.

एकाचा मृत्यू, तीन भाजले

मोबाइल नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज पडून घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाली आहेत. डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

काय घडले ?

डहाणू तालुक्यात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकटाला सुरुवात झाली. यादरम्यान, तालुक्यातील ओसरविरा गावच्या मानकरपाडा येथील काही मुलं मोबाइल रेंज मिळावी, म्हणून उंबराच्या झाडावर चढली होती.

सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या झाडावर वीज कोसळली आणि भीषण दुर्घटनेला या मुलांना सामोरं जावं लागलं. वीज अंगावर कोसळून रविन बच्चू कोरडा (वय १६) याचा जागीच मृत्यू झाला तर चेतन मोहन कोरडा (वय ११), दीपेश संदीप कोरडा (वय ११) आणि मेहुल अनिल मानकर (वय १२) हे तिघे जखमी आहेत.

यापैकी चेतन आणि दीपेश या दोघांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मेहुल याला अधिक उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.

नववीचा विद्यार्थी मृत

दरम्यान, ही सर्व शाळकरी मुले असून मृत पावलेला रविन हा इयत्ता नववी शिकत होता. जखमी विद्यार्थी हे सहावी ते आठवी इयत्तेत शिकणारे आहेत.

या गावात मोबाइला रेंज येत नसल्याने ही मुले पाड्यापासून दीड किमी अंतरावर झाडावर चढून नेटवर्क मिळविण्याच्या प्रयत्नात होती, तर काही झाडाखाली खेळत असताना ही घटना घडली.

Leave a comment