Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुणे विद्यापीठात योग अभ्यासक्रम सुरू होणार

पुणेः आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशीच पुणे विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा ‘बेसिक्स ऑफ योगा’ या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात झाली आहे.

शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी

कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर यांनी ही घोषणा केली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, आयुष मंत्रालयातील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन, आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद आदी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून व पारंपरिक ज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र यांची सांगड घालत हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबरच शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी हा योग अभ्यास उपयुक्त ठरेल, असेही करमळकर यांनी सांगितले आहे.

साठ तासांचा आॅनलाईन अभ्यासक्रम

या वेळी डॉ.अपूर्वा पालकर म्हणाल्या, हा अभ्यासक्रम योग विषयातील मूलभूत गोष्टींची माहिती देणारा संपूर्णपणे ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. ६० तासांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार आहेत.

समतोलासाठी उपयुक्त

मन, शरीर व भावना यांच्यात समतोल साधायचा असेल तर योग आवश्यक आहे. स्वतःला ओळखून आपण आहोत तसे स्वीकारण्याची शक्ती ही योग साधनेतून मिळते तसेच शिकण्याचा आनंद जागृतही ठेवता येतो. असे डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले आहेत.

Leave a comment