भाजपच्या आमदारांची तालिका अध्यक्षांना शिवीगाळ; 12 आमदार निलंबित

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तालिका अध्यक्षांना शिवीगाळ करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली.

अध्यक्षांच्या दालनात राडा

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली.

इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं.

त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आला. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

भाजपच्या या आमदारांचं निलंबन

आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडिया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामील होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

सभागृहात नेमकं काय घडलं ?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा, म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली.

त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. या वेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग, ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला.

त्या वेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

अध्यक्षांसमोरील माईक ओढला

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला.

या गदारोळात धक्काबुक्की झाली. या वेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.