पुणेः पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरडी कोसळल्या तसेच काही ठिकाणी लोहमार्गाचा भराव खचल्यानं लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या.

कोठे काय झाले?

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर लोणावळा-खंडाळा घाट क्षेत्रात मंकी हिल ते पळसदरी या दरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णत: ठप्प होती. पुणे-मुंबईदरम्यानच्या इंटरसिटी आणि दक्षिण भारतात ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

Advertisement

गेल्या काही दिवसांसून लोणावळा, खंडाळा परिसरात पाऊस पडत असल्याने लोणावळा, खंडाळा घाट परिसरात रेल्वे मार्गावरच दरडी कोसळल्या. काही ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटल्या आहेत. काही ठिकाणी रुळाखालची खडी वाहून गेली आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प आहे. रेल्वेकडून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लाइनवरील दरडी हटवण्यात आल्या होत्या; मात्र पुणे-मुंबई लाइन आणि ‘मिड लाइन’वरील काम सुरू होते, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

या गाड्यांच्या सेवेवर परिणाम

दरम्यान, दरडींमुळे पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे यादरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई-कोल्हापूर-मुंबई या दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि कोयना एक्स्प्रेस या गाड्या रद्द कराव्या लागल्या. यासह पुण्यामार्गे जाणाऱ्या मुंबई-हैदराबाद, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-गदग, लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या.

Advertisement

सोलापूर-इंटरसिटी एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुण्यापर्यंतच धावली. मुंबई-बंगळूर उद्यान एक्स्प्रेस पुण्यातून सोडण्यात आली. भुवनेश्वर-मुंबई एक्स्प्रेस लोणावळा येथे; तर विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस, गदग-मुंबई, साईनगर शिर्डी-दादर, पुदुच्चेरी-दादर, हुबळी-दादर, नांदेड-पनवेल,

काकिनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आदी गाड्या पुणे स्थानकात थांबविण्यात आल्या. एर्नाकुलम एक्स्प्रेस मनमाड-दौंड-पुणे-मिरज-लोंढा-मडगाव या मार्गे वळविण्यात आली आहे. सिंकदराबाद-पोरबंदर एक्स्प्रेस पुणे-दौंड-मनमाड- जळगाव-सुरतमार्गे रवाना करण्यात आली. भूजहून पुण्याला येणारी गाडी भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली.

Advertisement