मुंबई – क्रिकेट संघटनांच्या निवडणुका आणि राजकीय नेते यांचे नाते नवे नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी संघटनांच्या निवडणुकीची चांगलीच चर्चा होते. एकीकडे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक तर दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) अध्यक्षपदाची निवडणूक. अंधेरीत भाजपा-शिंदे गट विरुद्ध महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी लढत दिसली.

मात्र, एमसीए निवडणुकीत (MCA Election) एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे भाजपा (Bjp) , शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्ष एकत्र आलेले दिसले. यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे विविध राजकीय पक्षांचे पुढारी ज्या निवडणुकीच्या निमित्ताने एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक उद्या, गुरुवारी होत आहे.

यानिमित्त वानखेडे स्टेडियमवर आज, बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येत आहेत.

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हे सर्वजण एका व्यासपीठावर येत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोशल मीडियावर देखील या विषयी अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, या निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि आशीष शेलार (ashish shelar) यांनी संयुक्त पॅनल उभे केले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर तसेच, फडणवीस यांच्या खास मर्जीतील अमोल काळे व बहुजन विकास आघाडीच्या अजिंक्य नाईक यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार सत्तेत आलं.

आणि त्यामुळे शरद पवार यांचं महाविकास आघाडी सरकार कोसळ असल्याचं आपण पाहिलं. मात्र, हे सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तीन नेते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे.