कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र सातत्याने लसीकरणात आघाडीवर आहे. आताही लसीकरणातील आघाडी कायम ठेवली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा विक्रम महाराष्ट्राने नोंदविला आहे.

साडेपाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

राज्यात एकाच दिवशी तब्बल पाच लाख 52 हजार 909 जणांचे लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.

आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे दोन कोटी 85 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

यापूर्वी 26 एप्रिल रोजी एकाच दिवशी पाच लाख 34 हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, अशी माहिती राज्य समन्वयक असेही डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

देशात 8१ लाख नागरिकांचं लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकाच दिवशी 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.

16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आजच्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजेपर्यंत 80 लाख 9६ हजार 417 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

आतापर्यंत 28 कोटी नागरिकांचं लसीकरण

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 28 कोटी 33 लाख13 हजार 942 लोकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 23 कोटी 27 लाख 44 हजार 813 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर पाच कोटी 5 लाख 69 हजार हजार 129 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.