राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त येत होते; परंतु पवार यांनी स्वतःच हे वृत्त फेटाळले आहे.

काय पार्श्वभूमी?

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशी त्यांच्या झालेल्या भेटीगाठी, त्यानंतर सुरू झालेल्या काँग्रेसविरहीत तिसऱ्या आघाडीच्या चर्चा आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी घेतलेली राहुल गांधींची भेट अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

Advertisement

पुढील वर्षी होणा-या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांसाठी पवार यांची निवड व्हावी, यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी ही बैठक असल्याचंही बोललं गेलं; मात्र पवार यांना आपल्या मागच्या खासदारांच्या पाठबळाची जाणीव आहे.

पवार काय म्हणाले?

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर प्रशांत किशोर शरद पवार यांच्याशी दोनवेळा भेटले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार असल्याच्या सगळ्या चर्चा साफ खोट्या आहेत.

मला माहितीय की, ज्या पक्षाकडे 300 हून अधिक खासदार आहेत, त्या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे. मी या निवडणुकीसाठीचा उमेदवार असणार नाही.

Advertisement

प्रशांत किशोर यांची भेट वेगळ्या कारणासाठी

प्रशांत किशोर मला दोनदा भेटले, पण आम्ही त्यांच्या एका कंपनीबद्दलच बोललो. या भेटीमध्ये राष्ट्रपतिपदाची उमेदवारी अथवा 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व यासंदर्भात कसल्याही चर्चा आम्ही केली नाही.

प्रशांत किशोर यांनी मला सांगितलंय, की त्यांनी निवडणूक रणनीतीचं क्षेत्र सोडून दिलं आहे. आतापर्यंत राज्यांच्या निवडणुका अथवा 2024 च्या लोकसभा निवडणुका अशा कोणत्याच निवडणुका संदर्भात काहीही ठरलं नाही.

निवडणुका खूप लांब आहेत, राजकीय परिस्थिती ही सतत बदलत राहते. मी या येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचं नेतृत्व मी करणार नाही.

Advertisement