Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करणारा ठराव करा- राजू शेट्टी

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायद्यांना विरोध दर्शवणारा एक ठराव करावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली.

सरकार शेतक-यांची बाजू घेताना दिसत नाही

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील कित्येक महिने दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. 26 जूनला शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सात महिने पूर्ण झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शेट्टी म्हणाले, की केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. महाराष्ट्रामध्येही हा असंतोष आहे; पण महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची बाजू घेतल्याने हा विरोध तितका तीव्रपणे दिसत नाही.

26 जूनला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 7 महिने पूर्ण झाले आहेत, तरी सरकार गांभीर्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघत नाही.

राज्य शेतक-यांच्या मागे हे दाखवा

येत्या 5 जुलैला राज्य विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात कृषी कायद्यांबाबत एक ठराव करावा. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विधिमंडळचा पाठिंबा आहे, असा एकमुखी ठराव विधिमंडळाने संमत करावा.

संपूर्ण राज्य शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे, हे दाखवून द्यावे,” अशी मागणी पवार तसेच ठाकरे यांच्याकडे केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

पवारांशी वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा

दरम्यान, शेट्टी यांनी पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच यापूर्वी कृषी कायद्यांसदर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मागत आहोत.

पण दुर्दैवाने ते वेळ देत नाहीत, अशी तक्रारही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली होती; मात्र त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्र्याची भेट झाली, असेही त्यांनी सांगितले.

Leave a comment