पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादळग्रस्त पश्चिम बंगालमधील आढावा बैठकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बैठकीवेळी मोदींना अर्धातास ताटकळत ठेवल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केंद्र व भाजप नेत्यांकडून जोरदार टीका होत असताना, ममतांनी आक्रमक पवित्रा घेतला.

उलट मलाच बैठकीसाठी बराच वेळ थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी शनिवारी केला. विधानसभा निवडणुकीतील पराभव अद्याप मोदींच्या पचनी पडला नसल्यामुळे केंद्राकडून सूडाचे राजकारण केले जात आहे. तरीही बंगालच्या भल्यासाठी मी पंतप्रधानांचे पाय धरायला तयार आहे.

पण अशा प्रकारे माझा अवमान करू नका, अशी भूमिका ममतांनी घेतली आहे. वादळासंबंधीच्या आढावा बैठकीवेळी ममतांनी पंतप्रधानांना वाट पाहायला लावून त्यांचा अवमान केल्याचा आरोप सातत्याने केंद्रीय मंत्री व भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

Advertisement

मान-अवमानाच्या या मुद्यावरून भाजप नेते व तृणमूल काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने वाद पेटला आहे. यानंतर शनिवारी ममतांनी थेट पत्रकार परिषद घेत आढावा बैठकीवेळी नेमके काय झाले होते, याची सविस्तर माहिती देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

ममता म्हणाल्या की, मोदींचे हेलीकॉप्टर उतरण्याचे कारण देत मला २० मिनिटांनंतर कलाईकुंडामध्ये येण्यास सांगण्यात आले होते.

त्यानंतरही आपल्या हेलीकॉप्टरला १५ मिनिटे उशिरा उतरण्याची परवानगी मिळाली. तोपर्यंत पंतप्रधान बैठकीत दाखल झाले होते. बैठकस्थळी गेल्यानंतर देखील मोदींना भेटण्यासाठी मला बराच वेळ वाट पाहावी लागली.

Advertisement