Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्याला अटक

पुणे : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या व दोन महिने गुंगारा देणाऱ्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पुरंदर तालुक्यातील नीरा येथून ताब्यात घेवून अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे.

अभिषेक विकास रानवडे (वय २९, रा. नारायण पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्य वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अभिषेक याने २४ एप्रिलला अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते.

पोलिसांनी वेगवेगळ्या पथक तयार करून या आरोपीचा शोध सुरू केला होता. नऱ्हे, सिंहगड, चाकण, सांगली, सातारा भागात गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोध सुरू होता. यादरम्यान, रानवडे मुलीबरोबर बारामतीत असल्याची माहिती उपनिरीक्षक राकेश सरडे, बाबा दांगडे, प्रशांत शिंदे यांना मिळाली.

त्यानंतर पथकाने बारामती गाठले. पण, तो मुरुम गावात असल्याचे कळले. पोलीस आले असल्याचे समजताच रानवडे मुलीला घेऊन पुरंदर तालुक्यातील नीरा परिसरात गेला. पोलिसांनी मागावर जात त्यांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय टिकोळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक कुंडलिक कायगुडे, उपनिरीक्षक राकेश सरडे, खानविलकर, पूनम पाटील, संजय दगडे, बाबा दांगडे, प्रशांत शिंदे यांनी केली आहे.

Leave a comment