पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या पत्नी रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या तीन साथीदारांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना बुधवारी अटक करण्यात आली.

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावावर दमदाटी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा मंगलदास बांदल यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली असून

शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांच्या गाळ्यांवर २००४ मध्ये शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे आठ लाख रुपये कर्ज काढून ते स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन त्यांची दिशाभूल करून या गाळ्यांचे कुलमुखत्यार दस्त तयार करून घेतले.

मात्र, दरम्यान मांढरे यांनी पुरवणी दस्त दिलेला नसताना देखील मांढरे यांच्या जागेवर बनावट अनोळखी इसम उभा करून गोविंद झगडे व मोहन चिखले यांच्याशी संगनमत करून बनावट पुरवणी दस्त करून घेऊन त्या दस्ताचा गहाणखतासाठी वापर करून मंगलदास बांदल व रेखा बांदल यांनी पुन्हा बँकेतून एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढले.

याबाबत दत्तात्रय रावसाहेब मांढरे (रा. शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास विठ्ठलराव बांदल, जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर) यांच्यावर फसवणूक सह आदी गुन्हे दाखल केले असून मंगलदास बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी कौशल्याने गोपनीयता बाळगून अटक केली.